तार्केश झोपे मृत्यू प्रकरणी श्वान मालकावर गुन्हा दाखल

भुसावळ : कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी

होऊन मृत्यू झालेल्या तार्केश झोपे प्रकरणी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. संबंधित कुत्र्याच्या मालकाविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तार्केश झोपे यांचे वडिल विलास झोपे यांच्या दिलेल्या फिर्यादीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित कुत्रा मालक प्रकाश उर्फ खन्ना कोळी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे आणि आवश्यक खबरदारी न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.