मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ७ दुचाकी जप्त : भुसावळ बाजारपेठ पोलीस डी.बी. पथकाची कारवाई:

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण ७ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

या प्रकरणी फिर्यादी आशीष विनायक झोपे (वय ३६, रा. तापी नगर, भुसावळ) यांनी २२ एप्रिल २०२३ रोजी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७२/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर डी.बी. पथकाने रविंद्र विठ्ठल भदाणे (वय २९, रा. मोहाडी, ता. जामनेर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने साथीदार गजानन अशोक कोळी (वय २७, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) याच्या मदतीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यात होंडा शाईन, बजाज पल्सर (१२५, १३५, १५०) तसेच सुझुकी बर्गमन यांसारख्या दुचाकींचा समावेश आहे. या वाहनांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

या दुचाकी चोरीसंदर्भात भुसावळ, जामनेर, जळगाव एमआयडीसी आणि नांदुरा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी पार पाडली.

अटक आरोपींना २२ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.