लोणारी दांपत्यातर्फे अक्षय तृतीया निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न;


भुसावळ (प्रतिनिधी) –
अक्षय तृतीया या मंगलमय सणाच्या निमित्ताने खान्देशची परंपरा जपत सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपा नगरसेवक तथा गटनेता युवराजभाऊ लोणारी व सौ. मीनाताई लोणारी यांच्या तर्फे वॉर्डातील माता-भगिनींसाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात टाळांच्या गजरात आणि आनंदमय वातावरणात गौराईच्या पारंपरिक मिरवणुकीने झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीनंतर गौराईचे विधिवत पूजन करण्यात आले.

या प्रसंगी माहेरवाशीण भगिनींनी आपल्या माहेरच्या आठवणींना उजाळा देत झोके घेतले, फुगड्या खेळल्या आणि आखाजीची पारंपरिक गाणी गात सणाचा आनंद लुटला. महिलांमधील स्नेह, एकजूट आणि सांस्कृतिक परंपरांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

मनोरंजनात्मक उपक्रमांबरोबरच महिलांना एकत्र येण्याची आणि आपलेपणाची भावना वृद्धिंगत करण्याची संधी मिळाली. अशा कार्यक्रमांमुळे परंपरा जिवंत राहून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचतात.

कार्यक्रमाला प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई सावकारे, नगरसेविका पूनम इंगळे, सौ. मीनाताई युवराज लोणारी तसेच परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

परंपरा जिवंत राहून त्या नव्या पिढीने आत्मसाद कराव्या -युवराज लोणारी

आपले सण उत्सव व परंपरा याची माहिती व जाणीव येणाऱ्या पिढीला व्हावी त्यांनी संस्कृती जतन करावी या मुख्य हेतूने प्रेरित होऊन महिलांना खान्देश परंपरेमुळे अधिक आनंद मिळावा माहेरच्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी प्रमाणे करण्यात आले पुढील वर्षी यापेक्षा अधिक पद्धतीने आगळा वेगळा उत्सव साजरा अशी माहिती युवराज लोणारी यांनी दिली.