भुसावळात सणासुदीपूर्वी पोलिसांची धडक कारवाई; 14 सराईत गुन्हेगारांवर कारवाई, 2 फरार आरोपी अटकेत

भुसावळ (प्रतिनिधी) – आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भुसावळ उपविभागीय पोलिसांनी जोरदार ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत बाजारपेठ पोलिसांनी आर्म अॅक्ट व चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 14 सराईत गुन्हेगारांची तपासणी केली.

या कारवाईदरम्यान दोन फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर शहा जब्बार शहा उर्फ डमरू आणि केवल अनिल टाक (दोघेही रा. भुसावळ) यांचा समावेश आहे. हे दोघेही गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. त्यांच्या अटकेमुळे काही प्रलंबित गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोहिमेदरम्यान तपासण्यात आलेल्या आरोपींपैकी चार जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या नियोजनबद्ध आणि आक्रमक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी हालचालींवर मोठा आळा बसणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

ही कारवाई विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल व इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

सणासुदीच्या काळात नागरिकांनी निर्धास्तपणे उत्सव साजरे करावेत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयास्पद हालचाली आढळल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.