प्रवाशांनी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर टाळा – भुसावळ रेल्वे विभागाचे प्रवाश्यांना आवाहन:

भुसावळ (प्रतिनिधी) – मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये उपलब्ध असलेली अलार्म चेन पुलिंग (ACP) सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठीच वापरावी, असे आवाहन भुसावळ विभागाने प्रवाशांना केले आहे. अलीकडच्या काळात किरकोळ कारणांसाठी अलार्म चेन ओढण्याच्या घटना वाढल्या असून, या प्रकारामुळे शेकडो प्रवाशांना विलंब आणि गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, चुकून चेन ओढणे, गाडीत वेळेत चढता न आल्याने चेन ओढणे, मोबाईल फोन खाली पडणे किंवा इतर क्षुल्लक कारणांसाठी अलार्म चेन पुलिंगचा वापर केला जात आहे. मात्र, अशा प्रकारांना रेल्वे कायद्यानुसार गुन्हा मानले जाते आणि संबंधितांवर कारवाई केली जाते.

भुसावळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 495 अलार्म चेन पुलिंगच्या घटना नोंदवण्यात आल्या. यापैकी 426 जणांना दोषी ठरवण्यात आले असून, एकूण ₹1,43,200 दंड वसूल करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, एका किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी चेन ओढल्यास केवळ संबंधित गाडीच नव्हे, तर मागोमाग येणाऱ्या इतर गाड्यांवरही परिणाम होतो. परिणामी, शेकडो प्रवाशांचा वेळ वाया जातो.

रेल्वे कायदा कलम 141 अंतर्गत अलार्म चेनचा गैरवापर हा दंडनीय गुन्हा आहे. त्यामुळे प्रवाशांनी नियोजित वेळेपूर्वी स्थानकावर पोहोचावे आणि मर्यादित सामानासह प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग प्रवाशांसाठी स्टेशन मॅनेजर कार्यालयात बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या तसेच व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा लाभ घेऊन प्रवाशांनी वेळेत प्लॅटफॉर्मवर पोहोचावे आणि सुरक्षितपणे गाडीत चढावे, असेही प्रशासनाने सांगितले.

भुसावळ विभागाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करत, किरकोळ कारणांसाठी अलार्म चेन पुलिंग टाळून रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचे आवाहन केले आहे.