छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल विभागाची भुसावळ तालुक्यात समाधान शिबिरे

भुसावळ (प्रतिनिधी) – महसूल व वनविभागाच्या शासन निर्णय क्र. मराअ-2026/प्र.क.09/समन्वय-1, मंत्रालय मुंबई, दि. 18 फेब्रुवारी 2026 नुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत भुसावळ तालुक्यात दि. 07 मार्च 2026 ते दि. 15 मे 2026 या कालावधीत ‘महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा 1’ आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शासन निर्णयानुसार दि. 18 फेब्रुवारी 2026 ते दि. 05 मार्च 2026 या कालावधीत तालुक्यातील सर्व महसूल मंडळांकडून पूर्वतयारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर एक दिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिबिरांमध्ये मिळणाऱ्या सेवा.

या समाधान शिबिरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये – प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क , लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न, रहिवासी, जातीचे व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र अकृषक तरतुदींबाबत मार्गदर्शन , संपुष्टात आलेल्या सनद प्रणाली (कलम 42 अ, ब, क, ड) बाबत कार्यवाही , एक वेळचे अधिमूल्य भरण्याच्या नव्या व्यवस्थेबाबत माहिती , डिजिटल 7/12 ला कायदेशीर वैधतेबाबत जनजागृती , भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांत कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे , एक खिडकी योजनेअंतर्गत ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान व तक्रार निवारण

‘माझा 7/12 – अचूक 7/12’ विशेष मोहीम

शिबिरादरम्यान ‘माझा 7/12 – अचूक 7/12’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून 7/12 वरील पोकळस्थ शेरे, कालबाह्य नोंदी तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत लेखनप्रमादाच्या नोंदी दुरुस्त करण्याची सेवा दिली जाणार आहे.

लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत 7/12 वर पतीच्या नावासोबत पत्नीचे नाव नोंदविण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच ई-महासेवा केंद्रामार्फत इयत्ता 10 वी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे त्वरीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर महसूल संबंधित कामे तात्काळ मार्गी लावण्यात येतील.

मंडळ स्तरावर आयोजन

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे प्रश्न त्वरित सोडविणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने मंडळ स्तरावर शिबिरे घेण्यात येणार आहेत.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव, कुप्हें प्र.न., पिंपळगाव बु./खु. खडके आणि भुसावळ या पाच मंडळांमध्ये अनुक्रमे दि. 07 मार्च, 14 मार्च, 10 एप्रिल, 17 एप्रिल व 08 मे 2026 रोजी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शोभा घुले (नोडल अधिकारी), हेमंत शंकर गुरव, प्रिती सदाशिव लुटे, रजनी तायडे, पूजा संजय अवघडे, पी.एल. पाटील, वैशाली पाटील, जितेंद्र पाडवी, प्रफुल्ल कोथळे तसेच मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दि. 07 मार्च 2026 ते दि. 15 मे 2026 या कालावधीत आयोजित शिबिरांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नीता लबडे यांनी केले आहे.