शिक्षकी पेशाला काळीमा :आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार : मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील तलई येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या अधिक्षिकेविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२४ पासून मुख्याध्यापकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. वसतिगृहाच्या अधिक्षिकेने चहा देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांच्या खोलीत पाठविले जात असल्याचा आरोप आहे. त्या ठिकाणी खोली बंद करून गैरकृत्य करण्यात येत होते. याबाबत कोणाला सांगितल्यास मारहाणीची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने विद्यार्थिनीने कुटुंबीयांना माहिती दिली. तिची आत्या तिला घरी घेऊन जाण्यासाठी आश्रमशाळेत आली असता, संबंधितांनी विद्यार्थिनीला पाठविण्यास नकार दिला. उलट विद्यार्थिनीच्या चारित्र्यावर संशय निर्माण होईल असे पत्र पालकांना देण्यात आले.

अखेर ५ डिसेंबर रोजी विद्यार्थिनी घरी गेल्यानंतर तिने आईकडे संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानंतर कुटुंबीयांसह १५ डिसेंबर रोजी धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधिक्षिकेविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.