भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा हातोडा ; उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कलम 52 व 53 अंतर्गत नोटीस; 30 दिवसांत कारवाईचे आदेश

भुसावळ ( प्रतिनिधी )-

भुसावळ तालुक्यातील जामनेर रोड परिसरातील माऊली प्लाझा सर्वे नं. 115/1/अ, प्लॉट नं. 09 वरील इमारतीच्या बांधकामात गंभीर अनियमितता आढळून आल्याने प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 52 व 53 अंतर्गत संबंधित मालकास नोटीस बजावली आहे.

सहायक संचालक, नगररचना विभाग, जळगाव यांच्या तपासणी अहवालात सदर इमारतीच्या बांधकामात मंजूर नकाशाचे स्पष्ट उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे. मंजूर आराखड्यानुसार आवश्यक असलेली मोकळी जागा, सामाजिक अंतर, पार्किंग व्यवस्था तसेच रॅम्पची तरतूद करण्यात आलेली नसल्याचे अहवालात नमूद आहे. याशिवाय इमारतीचा वापर परवानगीशिवाय बदलण्यात आला असून, छतावर सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी न घेता मोबाईल टॉवर उभारण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

नोटिसीनुसार, भोगवटा प्रमाणपत्रातील अटी-शर्तींचे उल्लंघन करून अतिरिक्त व अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, हे बांधकाम तात्काळ हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांनी 30 दिवसांच्या आत स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून टाकावे, अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील कलम 55 व 56 नुसार प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल आणि त्याचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असा स्पष्ट इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.

दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी ही नोटीस बजावण्यात आल्याने शहरातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून, येत्या काळात इतर अनधिकृत बांधकामांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.