निंभोरा (ता. भुसावळ) : भारतीय बौद्ध महासभा, जळगाव पूर्व जिल्हा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय महिला धम्म प्रशिक्षण शिबिराचा समारोप व महिला धम्म मेळावा दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी निंभोरा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. त्यापूर्वी २५ डिसेंबर २०२५ रोजी महिला समता सैनिक दलाचे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले होते.

या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर उपस्थित होत्या. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवल्याने मेळाव्याला लक्षणीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा महिला अध्यक्ष प्रियंका अहिरे होत्या, तर स्वागताध्यक्ष सुमंगल अहिरे होते. प्रमुख उपस्थितींमध्ये राज्य संघटक लता तायडे, प्रचार व पर्यटन सचिव के. वाय. सुरवाडे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, सुशीलकुमार हिवाळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शमिबा पाटील, बौद्धजन परिषदेचे अध्यक्ष एन. टी. इंगळे, जळगाव पश्चिम महिला अध्यक्ष मंगला सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक वैशाली सरदार यांनी केले, तर सूत्रसंचालन सुशीलकुमार हिवाळे यांनी केले. प्रारंभी भंतेजींच्या सरदार परिवाराकडून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. जिल्हा व तालुका कार्यकारिणीकडून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात २०२५ वर्षातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या धम्मसेवकांचा सन्मान करण्यात आला. तसेच वर्षभर महिला उपासिका व समता सैनिक दल शिबिरे राबवणाऱ्या तालुक्यांतील महिला-पुरुष कार्यकर्त्यांना प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्ह्यात सर्वाधिक शिबिरे राबवणाऱ्या तालुक्यांमध्ये
मुक्ताईनगर (प्रथम), बोदवड (द्वितीय), जामनेर (तृतीय) यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. याशिवाय भुसावळ, जळगाव व रावेर तालुक्यांतील कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की,
“भारतीय राज्यघटना व धम्माने महिला-पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. दोघांनाही समान पातळीवर पाहिले गेले पाहिजे. महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये,” असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
शिबिरातील प्रशिक्षक व केंद्रीय शिक्षिकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये समता सैनिक दलाच्या महिला प्रशिक्षक ले. कर्नल मीना झिने (जालना) व ले. कर्नल रमेश साळव यांच्यासह विविध तालुक्यांतील केंद्रीय शिक्षिका सहभागी होत्या
या मेळाव्यामुळे महिलांना धम्म, समता व सामाजिक न्यायाच्या दिशेने प्रेरणा मिळाली असून, भविष्यात अशा उपक्रमांना अधिक विस्तार देण्याचे संकेत मिळाले आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माता रमाई ग्रुप, बौद्धजन परिषद, त्रिरत्न बुद्ध विहार तसेच अनेक महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी संजीवकुमार साळवे यांनी आभार प्रदर्शन केले.



