भुसावळ , (प्रतिनिधी ) –
भारताला क्रीडा क्षेत्रातील ‘सुपरपॉवर’ बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन, ‘फिट युवा फॉर विकसित भारत’ या ब्रीदवाक्यासह खासदार क्रीडा महोत्सव २०२५ (रावेर लोकसभा मतदारसंघ) या भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राउंडवर दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या संकल्पनेतून आणि उपस्थितीत आयोजन करण्यात आले असून, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री तसेच विविध लोकप्रतिनिधींची उपस्थिती लाभणार आहे.
या क्रीडा महोत्सवात ५००० हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून, फुटबॉल, कबड्डी, खो-खो यांसह विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींना क्रीडाक्षेत्रात व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील गुणवत्ता विकसित व्हावी आणि फिटनेसविषयी जनजागृती व्हावी, हा या महोत्सवामागील मुख्य उद्देश आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील क्रीडाप्रेमींमध्ये या महोत्सवाबद्दल मोठा उत्साह असून, भुसावळ शहरात क्रीडावातावरण निर्माण झाले आहे. उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


