जळगाव ( प्रतिनिधी)

नशिराबाद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चुरशीची ठरली असली, तरी या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला तो ७७व्या वर्षी
राजकारणात पदार्पण करून विजय मिळवणाऱ्या आजीबाई जनाबाई रंधे यांचा. ज्या वयात अनेकजण निवृत्तीचे आयुष्य स्वीकारतात, त्या वयात जनाबाई रंधे यांनी नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे.
प्रभाग क्रमांक ७ ‘अ’ मधून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या जनाबाई रंधे यांनी अत्यंत साधेपणाने आणि जिद्दीने प्रचार केला. कडक उन्हात, पायात चप्पलही न घालता त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. ना हातात काठी, ना कोणतीही शारीरिक तक्रार—त्यांचा उत्साह पाहून तरुणांनाही लाज वाटावी, असा हा प्रचार होता. विकासाची ग्वाही देत त्यांनी मतदारांचे मन जिंकले.
मतमोजणीदरम्यान जनाबाई रंधे विजयी झाल्याची घोषणा होताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. नगरपंचायत प्रांगणात कार्यकर्ते व नातेवाईकांची गळाभेट घेताना त्या भावुक झाल्या. हा क्षण उपस्थितांसाठीही अत्यंत भावनिक ठरला.
समाजासमोर प्रेरणादायी आदर्श
विशेष म्हणजे, ज्या वयात अनेकजण जबाबदाऱ्यांपासून दूर राहण्याचा विचार करतात, त्या वयात लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारत जनाबाई रंधे यांनी समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
त्यांचा हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून तो आत्मविश्वास, जिद्द आणि जनतेच्या प्रेमाचा विजय असल्याचे बोलले जात आहे. आज जनाबाई रंधे या केवळ नगरसेवक नसून, संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.


