नाशिक (प्रतिनिधी)

सातपूर परिसरात अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याच्या आरोपावरून संतप्त जमावाने एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर परिस्थिती इतकी चिघळली की, जमावाने थेट पोलिस चौकीत घुसून संशयितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच एका पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर येथील हिंदी शाळेजवळ एका तरुणाने अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर बसण्याबाबत आक्षेपार्ह बोलून तिचा विनयभंग केला. हा तरुण यापूर्वीही मुलीला वारंवार त्रास देत असल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक व नागरिकांनी तरुणाला पकडून मारहाण केली.
घटनेची माहिती ११२ हेल्पलाईनवर मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जमावाच्या तावडीतून तरुणाला सोडवून त्याला बोलकर पोलिस चौकीत आणण्यात आले. मात्र, मुलीचे वडील आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहा जणांनी पोलिस चौकीत गोंधळ घालत संशयितास पोलिसांच्या समोरच मारहाण केली.
या वेळी पोलिस अंमलदार अमोल मोरे यांच्या कमरेला असलेले पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश आहेर यांच्या अंगावरही जमाव धावून गेल्याची माहिती आहे. या घटनेमुळे काही काळ पोलिस चौकीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
पोलिस अंमलदार दीपक चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, संशयित तरुणाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मुलीचे वडील व इतर सहा जणांविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेनंतर नाशिक शहरात पोलिस यंत्रणेच्या अधिकार व कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलिसांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


