भुसावळ (प्रतिनिधी) –

दहशतवादी संघटनांकडून पैसे घेतल्याच्या बनावट आरोपाखाली अटक होण्याची भीती घालून भुसावळातील वीज वितरण कंपनीच्या 86 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची तब्बल 80 लाख 5 हजार 416 रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नागरिकांना फसव्या कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
भुसावळ शहरातील रहिवासी सुखदेव चौधरी (वय 86) हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. 27 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. कॉल करणाऱ्याने आपण डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे भासवले. काही वेळानंतर फोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जोडत असल्याचे सांगून चौधरी यांना व्हिडीओ कॉल करण्यात आला.
व्हिडीओ कॉलद्वारे स्वतःला मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्याचे अधिकारी विजय त्रिपाठी असल्याचे सांगणाऱ्या भामट्याने चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून अनेक लोकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर संजय पिसे नावाच्या आणखी एका भामट्याने संपर्क साधून, अंधेरी (पूर्व) येथील कॅनरा बँकेत त्यांच्या नावाने खाते उघडून त्या खात्याचा वापर दहशतवादी संघटनांनी केल्याचे बनावट कागदपत्रे सोशल मीडियावर पाठवली. मनी लॉन्डरिंग व दहशतवाद्यांकडून पैसे घेतल्याचा गुन्हा दाखल असल्याचे सांगत अटक व वॉरंटची भीती घालण्यात आली.
या प्रकरणाची कुणालाही माहिती देऊ नये, अशी ताकीद देत चौधरी यांच्याकडून न केलेल्या गुन्ह्याची लेखी कबुली घेण्यात आली. तसेच रिझर्व्ह बँकेत पडताळणीसाठी पैसे जमा करणे आवश्यक असल्याचे सांगून वेगवेगळ्या तीन बँक खात्यांमध्ये 80 लाखांहून अधिक रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतली. भामट्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शिक्क्याचे बनावट पत्रही पाठवले.
पैसे दिल्यानंतर आरोपींचे मोबाईल फोन बंद झाले. पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच चौधरी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस निरीक्षक सतीश गोराडे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने स्वतःला पोलिस, बँक अधिकारी किंवा सरकारी यंत्रणांचे प्रतिनिधी सांगणाऱ्या व्हॉट्सअॅप व व्हिडीओ कॉल्सपासून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.


