भुसावळ (प्रतिनिधी ) –
गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF), दावत-ए-इस्लामी हिंदची कल्याणकारी शाखा, यांच्यावतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ब्लँकेट वाटप मोहिमेअंतर्गत १२ डिसेंबर रोजी भुसावळ शहरात गरजू व असहाय लोकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत जामनेर रोड, खडका रोड, मॉडर्न रोड, शिवाजी कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसरात राहणारी गरजू कुटुंबे, लहान मुले, वृद्ध तसेच प्रवाशांना थंडीपासून दिलासा मिळावा यासाठी ब्लँकेट वितरित करण्यात आली. ब्लँकेट मिळाल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान व हसू हेच या कार्यक्रमाचे मोठे यश ठरले.
दावत-ए-इस्लामी हिंदचे जळगाव जिल्हाध्यक्ष झुबेर अत्तारी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार व स्वयंसेवकांचे आभार मानले. अशा पुण्यकर्मामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन देणगी देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (वेबसाइट: www.gnrf.in/donations/gnrf)
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफिक रोशन काद्री, शहराध्यक्ष सईद अत्तारी, युसूफ खान, जहांगीर खान, खालिद अत्तारी, साबीर मणियार, हाजी तनवीर, हाजी शाकीर, इम्रान शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.


