वरणगाव पालिकेबाहेर भाजप बंडखोर उमेदवार सुनील काळे यांचे ठिय्या आंदोलन -मतमोजणी 3 डिसेंबरला करण्याची मागणी

वरणगाव, 3 डिसेंबर 2025 : राज्यातील नगरपालिकांच्या निवडणूक निकालांबाबत निवडणूक आयोगाने केलेल्या बदललेल्या वेळापत्रकाला विरोध करत वरणगावातील भाजपाचे बंडखोर उमेदवार सुनील काळे यांनी मंगळवारी रात्री नगरपालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. रात्री आठच्या सुमारास सुरू झालेल्या या आंदोलनात काळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत 3 डिसेंबरलाच मतमोजणी घेण्याची मागणी केली.

निवडणूक आयोगाने अपीलमध्ये गेलेल्या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी राज्यभरात 20 डिसेंबरला मतदान व 21 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याची घोषणा केली होती. मात्र नागपूर खंडपीठाने मतदारांवर प्रभाव पडू नये म्हणून 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी पुढे ढकलून 21 डिसेंबरला निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्व पालिकांना दिले.

या निर्णयाला सुनील काळे यांनी तीव्र विरोध दर्शवला. “19 दिवस निकालाची प्रतीक्षा हा उमेदवारांवरील अन्याय आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो; पण 3 रोजी मतमोजणी व्हावी, अशी आमची मागणी आहे,” असे काळे यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना लिखित पत्र दिले.

स्ट्राँगरुममध्ये 19 दिवस उमेदवार किंवा प्रतिनिधींना थांबणे शक्य नसल्याने तात्काळ मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी काळे व कार्यकर्त्यांनी केली.