बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू : इंस्टाग्रामवर शिवीगाळचा व्हिडिओ केल्याच्या आला राग :

यावल (वार्ताहर ) – इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ बनवल्याच्या वादातून अठरा वर्षीय तरुणावर हल्ला करून त्याचा बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यावल-शेळगाव बॅरेज रस्त्यावर २ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. मृत तुषार चंद्रकांत तायडे (वय १८, रा. समता नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश व्यक्त केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सहा ते सात जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुषार तायडे हा काही दिवसांपूर्वी यावल तालुक्यातील परसाडे येथे झालेल्या नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेला होता. दोन डिसेंबर रोजी सायंकाळी तो आपल्या मित्राच्या दुचाकीवरून जळगावकडे परतत असताना, यावल–बोरावल मार्गावरील पाण्याच्या पाटाजवळील शेळगाव बॅरेज रस्त्यावर त्याचा मार्ग रोखण्यात आला. इंस्टाग्रामवर केलेल्या शिवीगाळीच्या व्हिडिओचा राग मनात ठेवून संशयित राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे (दोन्ही रा. जळगाव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी तुषारवर लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठ्यांनी हल्ला चढवून बेदम मारहाण केली.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, ३ डिसेंबरच्या मध्यरात्री तुषारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल सोनवणे, विक्रम सोनवणे तसेच इतर अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलिस करत आहेत.