भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील श्री दत्त गिरनारी मठामध्ये २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या दरम्यान ९ दिवसांचे भव्य आध्यात्मिक पर्व आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने मठात उत्सवांतर्गत भजन-गायन रंगात आले असून, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

- भव्य कार्यक्रमांची रूपरेषा:
२७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात श्री दत्त जन्मोत्सव, गुरुचरित्राचे पारायण, काकडा आरती, अभिषेक, श्रृंगार, महापूजा, नैवेद्य आरती, ललीता व श्री दत्त महाराजांचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
हा सोहळा सर्व भाविकांसाठी खुला असून, भाविकांना या काळात दत्त महाराजांचे दिव्य दर्शन घेता येणार आहे.
दत्त जयंती ४ डिसेंबर रोजी असून, या दिवशी दत्तमूर्तीचे दर्शन आणि पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भजन-गायन कार्यक्रम
या उत्सवांतर्गत दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत विविध भजनी मंडळांचे भजन-गायन होणार आहे.
३० नोव्हेंबर: श्री दत्त महाराज बाळकृष्ण भजनी मंडळ
१ डिसेंबर: श्री जयजवान भजनी मंडळ
२ डिसेंबर: श्री दत्त भजनी मंडळ, फैजपूर
३ डिसेंबर: अंबूत येथील भजनी मंडळ
४ डिसेंबर: रात्री ९:३० ते १२:३० या वेळेत जळगाव येथील भजनी मंडळ
५ डिसेंबर: जळगाव येथील श्री दत्त भजनी मंडळ
उत्सवाचे विशेष आकर्षण
- प्रासादिक दत्तमूर्ती दर्शन: गिरनार पर्वतावरून मिळालेली प्रासादिक दत्तमूर्ती आणि अत्यंत सुंदर, तेजोमय एकमुखी दत्तमूर्तीचे दर्शन अक्षय तृतीया, गुरुपौर्णिमा, नरसिंह जयंती आणि दत्त जयंती या वर्षातून केवळ ४ वेळाच खुले केले जाते. दत्त जयंतीला भाविकांना हे दुर्मीळ दर्शन घेता येणार आहे.
- मठामध्ये शाळीग्राम शिळेची करवीर निवासिनी श्री अंबाबाई मातेची मूर्ती, सद्गुरू गजानन महाराजांची मूर्ती, स्फटिकाची शिवपिंडी आणि निर्गुण पादुका देखील दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत.
- दत्त जयंतीला पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.या ९ दिवसांच्या आध्यात्मिक पर्वामध्ये सर्व दत्तभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त गिरनारी मठाचे स्वामी ब्रह्मानंद, गुरुबंधू आणि भजनी मंडळांनी केले आहे.


