मुक्ताईनगरमध्ये २४ वर्षीय तरुणाची चाकूने निर्घृण हत्या; दोन संशयीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात


मुक्ताईनगर (प्रतिनिधी): नगरपरिषद निवडणुकीमध्ये गावातील वातावरण तापलेले असतांना मुक्ताईनगर शहरात रविवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. शहरातील हॉटेल वृंदावनजवळील प्लॉटिंग भागातील मोकळ्या जागेत विष्णू गोसावी (वय २६, रा. मुक्ताईनगर) याचा मृतदेह आढळून आला. चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

विष्णू गोसावी हा गेले दोन दिवस बेपत्ता होता. रविवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता काही नागरिकांना प्लॉटिंग परिसरात त्याचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला.

डीवायएसपी सुभाष ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी ऋषिकेश आत्माराम पवार (वय २४) आणि आकाश आत्माराम पवार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विष्णू गोसावीचे कोणाशी प्रेमसंबंध होते आणि तो बेपत्ता झाल्यानंतर कोणाशी संपर्कात होता, याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून या गूढ खुनामागील सत्य लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.