जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील 364 शाळांच्या बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्काफ) अंतर्गत होणार आहे. या शाळांची पडताळणी करण्यासाठी 72 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आराखड्यात नमूद 128 मानकांच्या निकषानुसार बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

बाह्यमूल्यांकनात सहभागी पथकांना बाह्यमूल्यांकन कार्यपद्धती व सूचना देण्यासाठी डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक पार पडली. यावेळी बैठकीला वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह जिल्हाभरातील पर्यवेक्षीय यंत्रणा व पथकातील सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्काफ) याविषयी माहिती देऊन काटेकोरपणे बाह्यमूल्यांकन करण्याच्या सूचना दिल्या.
चौकट –
त्यानंतर स्काफ निर्मिती तज्ज्ञ व राज्यस्तरीय मार्गदर्शन समिती सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी स्वनिर्मित पीपीटीद्वारे पथकातील सदस्यांना स्काफची थोडक्यात माहिती, बाह्यमूल्यांकनाला जाण्याआधी, बाह्यमूल्यांकनाच्या दिवशी आणि बाह्यमूल्यांकनानंतर काय करावे यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन स्काफची कार्यपद्धती समजावून सांगितली. तसेच स्काफ ॲपचा डेमो देखील दिला. त्यानंतर डॉ. अनिल झोपे यांनी पथकातील सदस्यांसाठी आचारसंहिता व जबाबदारी याविषयी माहिती देऊन बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया नि:पक्षपातीपणे पार पडण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात स्वयंमूल्यांकन व बाह्यमूल्यांकन अशा दोन प्रक्रियांचा समावेश आहे. तसेच 6 क्षेत्रे 59 उपक्षेत्रे आणि 128 मानके यांच्या अंतर्गत प्रारंभिक, प्रगतशील, प्रगत व प्रवीण अशा चार स्तरांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेने स्वयंमूल्यांकन करावे आणि त्यानंतर त्या शाळांचे बाह्यमूल्यांकन करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या शैक्षणिक वर्षात स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर बाह्यमूल्यांकनाचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी काही निवडक शाळांमध्ये बाह्यमूल्यांकनाची अंतर्गत पडताळणी होणार आहे. सर्वाधिक गुणांकन प्राप्त जिल्ह्यातील पाच टक्के शाळा, पीएमश्री स्कूल, सीएमश्री स्कूल, मॉडेल स्कूल अशा जळगाव जिल्ह्यातील एकूण 364 शाळांचा यात समावेश आहे. या शाळांची पडताळणी करण्यासाठी चार सदस्यांचे एक पथक याप्रमाणे 72 पथकांच्या माध्यमातून 288 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका शाळेवर एक दिवस याप्रमाणे 364 शाळांच्या बाह्यमूल्यांकनाची प्रक्रिया लवकरच पार पाडली जाणार आहे. स्काफ बाह्यमूल्यांकनाला आनंददायी पद्धतीने सामोरे जावे, असे आवाहनही डॉ. जगदीश पाटील यांनी केले.


