वन्यजीव सप्ताहानिमित्त उपप्रशिक्षण केंद्र दीपनगर येथे जनजागृतीपर माहितीपट सादरीकरण

भुसावळ, (प्रतिनिधी ) : दरवर्षीप्रमाणे 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे जनमानसात पर्यावरण व वन्यजीवांविषयी आस्था निर्माण करणे, तसेच सर्वसामान्य जनता, अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग वाढवणे हा आहे.

या पार्श्वभूमीवर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील उपप्रशिक्षण केंद्र, दीपनगर येथे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी वन्यजीव जनजागृतीपर माहितीपट सादर करण्यात आला. हा माहितीपट  भूषण सुभाष पाठे, उपव्यवस्थापक (मा.सं) तसेच वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्फत सादर करण्यात आला.

या माहितीपटामध्ये  भूषण पाठे यांनी भारतातील जंगलांचे प्रकार, विविध जंगली प्राण्यांची ओळख, जळगाव जिल्ह्यातील वनांची वैशिष्ट्ये, स्थानिक पशुपक्ष्यांची माहिती, वन्यजीव संरक्षण कायदे, प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय दंडसंहितेतील कलम 428 व 429 या विषयांचा समावेश होता. माहितीपटाच्या माध्यमातून उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांच्यामध्ये वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमास माननीय मुख्य अभियंता  राजेश मोराळे, उपमुख्य अभियंता (प्रशासन)  राजेश कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहाय्यक व्यवस्थापक (मा.सं)  विराज कवठे, वरिष्ठ व्यवस्थापक (मा.सं)  ओमकार नागले व उपप्रशिक्षण केंद्र प्रमुख किरण

उज्जैनकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी वन्यजीव संरक्षणाबाबत बांधिलकी व्यक्त केली व पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प केला.