भुसावळ (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी लेवाहितवादी चळवळीतर्फे शिवपूर कन्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव येथे अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. राज्यावर निर्माण झालेल्या दुष्काळाच्या संकटाची जाणीव ठेवत पारंपरिक सभागृहाऐवजी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जयंती साजरी करून शेतकरी बांधवांना संकटाचा सामना करण्यासाठी प्रेरित करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन साजरी करण्यात आलेली ही जयंती सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि शेतकरी हिताचा संदेश देणारी ठरली. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी अत्यंत कणखर नेतृत्व केले. त्याच प्रेरणेतून शेतकऱ्यांनीही खंबीरपणे उभे राहत दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे लेवाहितवादी चळवळीचे प्रवर्तक शिशिर जावळे यांनी सांगितले. सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांना प्रत्येकाने आपापल्या परीने मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भुसावळ श्री गजानन महाराज पायी दिंडीचे आयोजक तथा संत सेवा मंडळाचे प्रकाश जैस्वाल यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शेतकरी आज अनेक नैसर्गिक आणि आर्थिक संकटांचा सामना करीत असून, अशा परिस्थितीत त्यांना मदत करणे हे समाजातील प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी दुष्काळाच्या समस्येवर भाष्य करताना वृक्षतोड आणि जंगल क्षेत्रात होणारी घट ही पर्यावरणीय असमतोलाची महत्त्वाची कारणे असल्याचे सांगितले. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात शेततळे निर्माण करावे. तसेच पावसाळ्यात शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे लावून केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन व संवर्धन करावे. 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संकल्प प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन त्यांनी केले. यांची होती उपस्थिती : कार्यक्रमाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख देवेंद्रभाऊ वराडे, सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्थेचे चेअरमन यशवंतभाऊ पाटील, महालक्ष्मी ग्रुप भुसावळचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मुरलीभाऊ लोखंडे, गजानन भक्त वासुदेव कोल्हे, प्रतिष्ठित शेतकरी मिलिंद धांडे, तुकारामभाऊ खाचणे, सामाजिक कार्यकर्ते बापू महाजन, शंकर भुसे आणि प्रांजल पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.


