जळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ आणि भारतीय जनता पक्षाच्या धोरणांविरोधात रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे पश्चिम जिल्हाध्यक्ष अविनाश भाऊ भालेराव, प्रदेश प्रतिनिधी मुन्नवर खान, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष कैलास शेळके यांच्यासह अंकुश कटारे, नितीन सूर्यवंशी, संजय खडसे तसेच काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कर्नाटक एक्स्प्रेसने दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबतचे प्रश्न आणि केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे. तसेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद आणि एकजूट या आंदोलनातून प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात देशभरातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सहभागही लक्षवेधी ठरणार आहे.


