भुसावळ (प्रतिनिधी- १७ ऑक्टोबर २०२५:) –
“दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा!” या उक्तीला खरीखुरी साज चढवला तो सक्षम नारी फाउंडेशनने, ज्यांनी यावल तालुक्यातील दुर्गम भागातील पांढरी वस्ती येथील आदिवासी तांड्यांवर जाऊन दिवाळीचा खरा अर्थ साकार केला.फटाक्यांची तडतड आणि फराळाचा घमघमाट , उटण्याचा सुगंध, रांगोळीची आरास, आप्तेष्टांचा सहवास… दिवाळी म्हणजे आनंदाची लूट असते. पण कित्येक गरीब कुटुंबामध्ये मात्र दिवाळी म्हणजे सण नसून फक्त अजून एक दिवस असतो. सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या या भावंडांमध्येही दिवाळीचा आनंद , ज्यांच्या आयुष्यात दूरदूरपर्यंतही पोहोचत नाही, अशा भगिनींसाठी सक्षम नारी फाउंडेशनतर्फे दिवाळीच्या फराळाचे वाटप, तसेच महिलांना नवीन साड्या व कपड्यांचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, हा आकाश कंदिलाच्या झगमगाटालाही लाजवणारा होता. एखादा नवा कपडा किंवा चविष्ट फराळ यांचे मूल्य जेव्हा कोणाला कधीच मिळाले नाही, तेव्हा त्यांना मिळणारा आनंद हा खराच अनमोल असतो.

यावेळी सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर, डॉ. दीप्ती पाटील, राजवीर पाटील, डॉ. वैशाली रामवंशी, पारुल वर्मा, संगीता जगताप, सुनिता जोशी, शीतल भालेराव, गायत्री विसपुते,पत्रकार उज्वला बागुल , संघमित्रा ठाकणे, वंदना कांबळे, योगिता ठाकूर सह एकता भगत ,ऍड मंजुषा कुळकर्णी या उपस्थित होत्या. यशस्वी आयोजनासाठी संगीता जगताप,ऍड जास्वंदी भंडारी, पल्लवी अंवाडे, शीतल मोरे , यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत ‘सक्षम नारी फाउंडेशन’ने उजाळा दिला त्या दिवाळीला, जी प्रकाश फक्त दिव्यांत नव्हे, तर मनामनांत पेरते.



