जळगावच्या भोकर SBI बँक दरोड्याचा धक्कादायक उलगडा! १६ लॉकर फोडणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक


तुरुंगातील ओळखीतून दरोड्याचा कट; चौघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात, १५ लाखांची रोकड व सोन्याचे दागिने जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर भरदिवसा झालेल्या सशस्त्र दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेतील तब्बल १६ लॉकर फोडून सोने आणि रोकड लुटणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार शंकर जासक हा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) असल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या जासकने कारागृहात असतानाच या नव्या दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती आहे.

२०२३ मधील कोट्यवधींच्या दरोड्यातही सहभाग

मुख्य आरोपी शंकर जासक याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बँकेतून सुमारे ३.१७ कोटी रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. या दरोड्याच्या प्रकरणात जासकचा सहभाग असल्याचे सांगितले जाते. या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर तो जळगाव मध्यवर्ती कारागृहात होता. काही महिन्यांपूर्वी जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला होता.

कारागृहात असतानाच त्याची ओळख गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली. पवार हा २०२४ मध्ये चाळीसगाव परिसरात घडलेल्या हत्या प्रकरणात कारागृहात होता. तोदेखील काही काळापूर्वी जामिनावर बाहेर आला होता. कारागृहातील या ओळखीचे रूपांतर पुढे गुन्हेगारी कटात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बँकेत ४० ते ४५ मिनिटे दहशतीचे वातावरण

भोकर येथील SBI शाखेत दरोड्याच्या दिवशीसंशयीत आरोपी शंकर जासक आणि गजानन पवार यांच्यासह चार जणांनी प्रवेश केला. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवत आरोपींनी बँकेतील कर्मचाऱ्यांना धमकावले. बँक व्यवस्थापक आणि कॅशियर यांना जीवे मारण्याची धमकी देतसंशयितांनी आरोपींनी कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण केला.

त्यानंतर बँकेतील तब्बल १६ लॉकर उघडण्यास भाग पाडण्यात आले. लॉकरमधील सोने आणि रोकड पाच ते सहा मोठ्या बॅगांमध्ये भरून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जवळपास ४० ते ४५ मिनिटे बँकेत दहशतीचे वातावरण होते.

ग्रामस्थांचा पाठलाग; चार बॅगा रस्त्यावर फेकल्या

दरोडा टाकल्यानंतर आरोपी धरणगावच्या दिशेने पळत असताना स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली होती. ग्रामस्थांचा पाठलाग आणि पोलिसांचा वाढता दबाव यामुळे आरोपींची धावपळ उडाली.

या गोंधळात आरोपींनी चावलखेडा परिसरानजीक चार बॅगा रस्त्यावर फेकून दिल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी विशेष पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली.

शेतात लपलेल्या मुख्य आरोपींना अटक

पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केल्यानंतर शंकर जासक आणि गजानन पवार हे दोघे एका शेतात लपून बसल्याचे आढळले. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात अन्य दोन संशयीत आरोपींनाही अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलिसांनी संशयीत आरोपींकडून सुमारे १५ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने असलेल्या बॅगा जप्त केल्याचे सांगितले जात आहे.

टोळीचे आणखी गुन्हे उघड होणार?

या दरोड्यामागे नेमके कोणते नियोजन होते, आरोपींना बँकेतील लॉकर आणि सुरक्षाव्यवस्थेची माहिती कशी मिळाली, तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या अन्य दोन संशयीत आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासली जात आहे.

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीनेच या दरोड्याचे नेतृत्व केल्याची माहिती समोर आल्याने पोलीस यंत्रणेसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या टोळीने यापूर्वी आणखी कोणते गुन्हे केले आहेत का, याचा उलगडा पोलिसांच्या पुढील तपासातून होण्याची शक्यता आहे.