भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन व जिल्हा बंदी असल्याने महानगरातून आपल्या गावाकडे पायी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांना भुसावळच्या लोणारी मंगल कार्यालयात थांबवून त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवारागृहात २० लहान मुले सुध्दा आहेत. निवारागृहात आलेल्या सर्वांच्या वैद्यकिय पथकाने तपासणी केली. यात या लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याचे स्पष्ट झाले. ती वाढविण्यासाठी त्यांना आहारात सकाळी दुध देण्याचा सल्ला डॉक्टरानी दिला.तहसील व नगरपालिका विभाग यांच्या वतीने समन्वयाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने ही बाब अंतर्नाद प्रतिष्ठानकडे मांडली. त्यानंतर या मुलांना १२ एप्रिल पासून दररोज सकाळी साधारण साडे चार लिटर दुध आणि बिस्किट वाटपाची जबाबदारी संचारबंदी कायम असे पर्यंत अंतर्नाद प्रतिष्ठानने घेतली आहे. दररोज दुध वाटप करतांना मुलांच्या अंगावर पुरेसे कपडे नव्हते हे अंतर्नादच्या स्वयंसेवकांच्या लक्षात आले. शहरातील रीगल ड्रेसेसचे संचालक विनोद जैन यांच्याशी याबाबत संपर्क साधल्यानंतर त्यांनीही सामाजिक दायीत्व निभवत या मुलांना नवीन कपडे देउन मदतीचा हात दिला. लिटील फ्लावर्स फन प्ले स्कूलचे संचालक संजय यावलकर यांच्याकडून प्रत्येक बालकास खेळणी देण्यात आली. दुध बिस्किट, नवीन कपडे आणि खेळणी पाहून लहान मुलांचे चेहरे आनंदाने फुलले आणि त्यांच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. या उपक्रमासाठी ज्ञानेश्वर घुले, जीवन महाजन, समाधान जाधव, अमितकुमार पाटील, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, अमित चौधरी, देव सरकाटे, प्रमोद पाटील, भूषण झोपे, संदीप रायभोळे, विक्रांत चौधरी, संजय भटकर, सुनील वानखेडे, प्रा.श्याम दुसाने, शैलेंद्र महाजन, हरीष कोल्हे, ईश्वर पवार, सचिन पाटील, निवृत्ती पाटील, संदीप सपकाळे,मंगेश भावे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे सहकार्य लाभत आहे.



