भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील समता नगर व सिंधी कॉलनीत कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आज दि.२६ एप्रिल सोमवार रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी भेट दिली. शासकीय विश्रामगृहात प्रशासनातील अधिकार्यांसोबत बैठक घेत जामनेर रस्त्यावरील सिंधी कॉलनी तसेच समता नगर भागात पाहणी करीत अधिकार्यांना उपाययोजनांबाबत सूचना केल्या. शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. शहरात दोन भाग सील करण्यात आल्याने नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासह आरोग्य विभागाकडून होणार्या उपाययोजनांबाबत प्रसंगी माहिती जाणून घेण्यात आली तसेच प्रशासनाला काही सूचनाही करण्यात आल्या. याप्रसंगी प्रांत रामसिंग सुलाने,तहसीलदार दीपक धीवरे,उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे,बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान समता नगर व सिंधी कॉलनीत कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने हा भाग पूर्णपणे सील केला असून अतिअत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही या भागात जाण्या-येण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांनी या भागाची पाहणी करून अधिकार्यांना सूचना केल्या.यावेळी आमदार संजय सावकारे,नगरसेवक पिंटू कोठारी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



