डॉ. जगदीश पाटील भुसावळ भूषण पुरस्काराने सन्मानित

भुसावळ (प्रतिनिधी ) – बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य व महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार संजय सावकारे व रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते भुसावळ भूषण पुरस्कार २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भुसावळ येथील स्टॉर लॉनमधील राजवाडा पॅलेसमध्ये ब्रेकिंग महाराष्ट्र या मराठी वेब न्यूज पोर्टलच्या सहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित समारंभात डॉ. जगदीश पाटील यांना भुसावळ भूषण पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. भगवा फेटा, स्मृतिचिन्ह, बहिणाईंची कहाणी आणि गाणी हे डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी यांचे पुस्तक, भिंतीवरील घड्याळ ही भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, लाईव्ह ट्रेंड न्यूज पोर्टलचे संपादक शेखर पाटील, ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज पोर्टलचे कार्यकारी संपादक गणेश वाघ व संपादक अमोल देवरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वर्धापनदिनाचे औचित्य साधून प्रकाशित करण्यात आलेल्या विशेषांकाच्या मुखपृष्ठावर भुसावळचा विकासनामा हा डॉ. जगदीश पाटील यांचा लेखही छापून आला आहे.
भुसावळ शहरातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने व आपल्या बुद्धीकौशल्याने कार्य करणारे डॉ. जगदीश पाटील सर यांनी सातत्याने राज्यस्तरावर आपले कार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्याबरोबरच अभ्यासक्रम निर्मितीतही त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तसेच वेळोवेळी शिक्षकांना ते विविध विषयांचे प्रशिक्षण देत असल्याने मास्तरांचे मास्तर म्हणून त्यांची संपूर्ण राज्यभर ओळख आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार म्हणजे भुसावळ शहराच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा आहे. अशा त्यांच्या विविधांगी उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना भुसावळ भूषण पुरस्काराने सन्मानित आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.