भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे यार्डात नवीन गुड्स शेड प्लॅटफॉर्म जवळ गिट्टीने भरलेला मालगाडीचा एक डबा येथे घसरल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीओबीवाईएन ४१ बोगीचे ड्रायव्हर आर. के. मीना व गार्ड देवेंद्रसिंग हे खडी घेऊन खंडवा येथून भुसावळ रेल्वे यार्डात नवीन गुड्स शेड प्लॅटफॉर्म जवळ येत असतांना एकमेकांना जोडलेल्या रुळाच्या ठिकाणी गाडीचा रूळ बदलवितांना एक डबा घसरला. सुदैवाने रुळावरून घसरलेला डब्बा पूर्णपणे पलटी न होता रुळाच्या खालीच घसरल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ येथून उपमुख्य यार्ड प्रबंधक एस. ए. जोशी, रेल्वे सुरक्षा बलाचे यार्ड निरीक्षक दयानंद यादव, एएसआय के. एन. मिश्रा, हेड कॉन्स्टेबल के. पी. कोळी, कॉन्स्टेबल युसुफ तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणारी अत्याधुनिक हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने युद्धपातळीवर काम करून हा डबा रेल्वेवे रुळावर आणला. त्यानंतर काही तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली. घटनेच्या ठिकाणी रेल्वेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्या तरी खंडवा ते भुसावळ येणाऱ्या व जाणाऱ्या मालगाडयांवर याचा काही परिणाम झाला नाही.



