भुसावळ – मनाचा विस्तार करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे आपल्या मनात नवनवीन कल्पना निर्माण होतात. चूक दुरूस्त करून अचूक काम करायला बळ देणारी गोष्ट म्हणजे नियमित वाचन. संकटाला आवरणारे व संकटातून सावरणारे साधन म्हणजे वाचन होय, असे प्रतिपादन भुसावळ येथील वेलनेस फाऊंडेशनचे संचालक मानसोपचार तज्ज्ञ प्रा. नीलेश गोरे यांनी केले.

भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या १५३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘वाचनालय आपल्या शाळेत’ या उपक्रमांतर्गत म्युनिसिपल हायस्कूलमध्ये आयोजित समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर, ग्रंथपाल नितीन तोडकर, अवधूत दामोदरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी मराठी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा म्युनिसिपल हायस्कूलतर्फे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी तर सार्वजनिक वाचनालयातर्फे अध्यक्ष हिंमत ठाकूर यांनी सत्कार केला. ‘मानसिक सक्षमतेसाठी वाचन’ या विषयावर बोलताना मानसोपचार तज्ज्ञ प्रा. नीलेश गोरे म्हणाले की, स्मार्टनेस मिळवण्याचा सोपा पर्याय म्हणजे वाचून ज्ञानी होणे. मुले जितकी खोडकर असतात, तितकीच बुद्धिवान असतात. पण खोडकरपणाचा स्तर वाढला की, बुद्धिवान असूनही फायदा होत नाही. त्यामुळे ही ऊर्जा आपल्याला चांगल्या कामासाठी वळवायची असेल तर वाचन त्याला नेहमी मदत करत असते, असेही ते म्हणाले. इंटरऍक्टिव्ह स्टोरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अगदी तल्लीन होऊन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत वाचन आणि वाचनातून मिळवलेल्या ज्ञानाचे फायदे जाणून घेतले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तकांसोबतच इतर पुस्तके वाचण्यासाठी वाचनालयात जावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रदीप साखरे यांनी तर आभार वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर यांनी मानले.


