भुसावळ – आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य जपायला हवे. त्यासाठी आपल्याला फास्टफूडच्या जमान्यातून बाहेर निघून होम मेड पदार्थ वापरण्याची सवय करून घ्यायला हवी. त्यामुळे आपल्या आरोग्यावर बाहेरील पदार्थांचा प्रतिकूल परिणाम होणार नाही. उत्तम आरोग्य हवे असेल तर खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी असायला हव्यात, असे प्रतिपादन भुसावळ येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत अग्रवाल यांनी केले.

भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या 153 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून के. नारखेडे विद्यालयात वाचनालय आपल्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. हेमंत अग्रवाल यांनी आरोग्याच्या विविधांगी सूचना दिल्या. व्यासपीठावर के. नारखेडे विद्यालयाचे प्राचार्य नितीन किरंगे, वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर, बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील, वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर, अवधूत दामोदरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी वाचनालयाच्या इतिहासाचा सर्वांगीण आढावा घेतला. आरोग्याकडून वाचनाकडे या विषयावर बोलताना डॉ. हेमंत अग्रवाल यांनी स्वच्छता व आरोग्य या विषयाची माहिती देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितली. सूत्रसंचालन डॉ. जगदीश पाटील यांनी तर आभार के. नारखेडे विद्यालयाचे ग्रंथपाल विनोद भंगाळे यांनी मानले.
पाठ्यपुस्तकासोबतच इतर पुस्तके देखील वाचावी – डॉ. जगदीश पाटील
शालेय अभ्यासक्रमात असलेल्या पाठ्यपुस्तकांसोबत आशयाला धरून असलेली इतर पूरक पुस्तके वाचणे विद्यार्थीदशेत आवश्यक आहे. वाचनामुळे आपल्या बौद्धिक व मानसिक क्षमतेत वाढ होऊन आपल्या कौशल्यांचा देखील विकास होत असतो. त्यामुळे ऑनलाईन माहितीसह वाचन करण्याबरोबरच वाचनालयात जाऊन इतर संदर्भीय पुस्तकांचे देखील वाचन करणे महत्त्वपूर्ण असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.


