भुसावळ, : ढोल, डमरु, तुणतुणे, शंख, संबळ, ढोलकी आदी पारंपरिक वाद्ये रंगमंचावरील पाहुण्यांनी वाजवत आगळ्या वेगळ्या पद्धतीने अकराव्या खान्देश नाट्य महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी सकाळ सत्रात अप्रतिम दोन बालनाट्ये सादर झाली.
कृष्णाचंद्र सभागृहात आज सकाळी नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सव सुरू झाला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ओबेनॉल कंपनीचे संचालक अश्विनकुमार परदेशी होते. तर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्या उद्घाटन झाले. यावेळी शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, ताप्ती एज्युकेशन सोसायटी चेअरमन महेश फालक, यशवंत डेअरीचे संचालक हर्षद महाजन, आनंद ड्रेसेस चे संचालक सुनील जैन, व्यसायीक विलास चौधरी, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोनु मांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वर्गीय नानासाहेब फालक यांच्या प्रतिमेचे पुजन झाल्यावर पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सगळ्यांच्या हातात एक एक पारंपरिक वाद्य देण्यात आले. मोहन फालक यांच्या गळ्यात ढोल, परदेशी यांच्या कडे संबळ, लाहोटी यांच्या कडे ताशा, मांडे यांच्या कडे डबरु, कोष्टी यांच्या कडे तुणतुणे देण्यात आले. सर्वांनी एकाच वेळी वाजवून महोत्सवाचे उद्घाटन केले. संस्थेचे अध्यक्ष अनिल कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. सचिव धर्मराज देवकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तर सुशील पाटील व धनश्री जोशी यांनी सुत्रसंचलन केले.
उद्घाटन सत्रा नंतर डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल निर्मित व धनश्री जोशी दिग्दर्शित ‘कोर्ट ऑफ कार्लेकर’ या सादर करण्यात आलेल्या बालनाट्यात फास्ट फूड पेक्षा पारंपरिक पौष्टिक आहार चांगला असल्याचा संदेश देण्यात आला. तर अहिल्यादेवी कन्या विद्यालय निर्मित व सोनाली वासकर दिग्दर्शित ‘चम चम चमको’ या बालनाट्यातुन मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडु द्यावे असा संदेश देण्यात आला. तर सायंकाळी जगत थिएटर रत्नागिरी निर्मित व स्वप्नील जाधव दिग्दर्शित ‘निर्वासित’ हे नाटक सादर झाले.
उद्या (ता. ४) संध्या. सात वाजता पुणे निर्मित, ‘संगीत कमली की सत्वपरीक्षा’ हे विनोदी अंगाने जाणारे नाटक सादर होणार आहे. तर रविवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजता परिवर्तन, जळगाव निर्मित, ‘अमृता साहिर इमरोज’ हे नाटक सादर होणार असून, त्यानंतर लगेचच पुणे निर्मित, ‘गावकथा’ हा संगीत नृत्याने सजलेला अंतर्मुख करणारा नाट्यविष्कार पाहायला मिळणार आहे.

–


