भुसावळ – श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ यांची साप्ताहिक सभा सोमवारी दि. 2 रोजी झाली. सभेची सुरुवात प्रकाश ठाकूर यांनी रामनामाने केली. ब्रह्मचैतन्य परमपूज्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन अर्चनाताई ठाकूर यांनी केले. सचिव रागिणी पुराणिक यांनी सर्वांचे स्वागत केले व प्रास्ताविक केले. मुख्य वक्त्या डॉ.सौ.शुभांगी दिनेश राठी यांचा सन्मान संघाचे अध्यक्ष रघुनाथआप्पा सोनवणे यांनी भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन केला. त्यांना जी. आर. ठाकूर यांनी आमंत्रित केले होते. त्यांचा परिचय अलकाताई ढाके यांनी करून दिला. व्याख्यानाचा विषय आम्ही प्रेमाचे भुकेले यावर शुभांगी ताई एक तासभर बोलल्या. तान्ह्या बाळाला आईच्या प्रेमाची अपेक्षा असते. पुढे गुरुचे प्रेम, मित्रा-मित्रातील प्रेम, तारुण्यात पती-पत्नीचे प्रेम, ज्येष्ठ पणात पुन्हा मुला-नातवंडांच्या प्रेमाची भूक असे सर्व टप्पे त्यांनी उलगडून सांगितले. प्रेम ही अशी भावना आहे की ती दिसत नाही, शब्दात व्यक्त करू शकत नाही, ती कृतीतून दिसते. अस्खलित, आत्मीयतेने बोलणे, कौटुंबिक विविध संवेदनशील उदाहरणे सांगत त्याने श्रोत्यांची मने जिंकली. काही उदाहरणांनी श्रोते गहिवरून गेले अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय चापोरकर यांनी सर्वांचे आभार मानले. सभेची सांगता सुरेश पाचपांडे यांनी पसायदान व राष्ट्रगीताने केली.



