सावित्रीबाईंची वेशभूषा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा :

जळगाव – तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा धारण केली. तसेच जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत करण्यात आले.
दीपाली सोनवणे व पूर्वी भिल्ल यांच्यासह इतर विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा धारण केली होती. त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लताबाई मोरे, मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, मंजुषा पाठक, सुनंदा रोझतकर, साधना सूर्यराव, सविता निंभोरे, विनोद जयकर, डॉ.जगदीश पाटील आदींची उपस्थिती होती. त्यानंतर सावित्रीबाई फुले योजनेचा धनादेश मुलीला देण्यात आला. त्यानंतर डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सुमारे साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिष्यवृत्ती परीक्षेसारखी चार पर्यायी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रश्नांची उत्तरे नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला. या स्पर्धेत इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक वर्गातून प्रथम, द्वितीय व तृतीय अशी तीन बक्षिसे काढण्यात येणार असून त्यांना प्रजासत्ताकदिनी आयोजित समारंभात ती बक्षीसे प्रदान करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. प्रोजेक्टरद्वारे सातवीच्या वर्गात दाखवण्यात आलेल्या या लघुपटाचा लाभ इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.