मध्य रेल्वेच्या दहा कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापकांच्या सुरक्षा पुरस्काराने गौरव :

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मध्य रेल्वेवरील मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना “महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार” प्रदान केला. दिनांक 14.2.2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात, जानेवारी 2022 या महिन्यात या पुरस्कृत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कर्तव्यादरम्यान सतर्कता, अनुचित घटना टाळण्यात आणि रेल्वे संचालनात सुरक्षितता सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रु. 2000/- रोख पुरस्कार आहे.

श्री प्रमोद डेणे, हेड कॉन्स्टेबल, मुंबई हे दिनांक 26.11.2021 रोजी ट्रेन क्रमांक 11020 मध्ये एस्कॉर्ट ड्युटी करत असताना त्यांना मध्यरात्री जळण्याचा वास आला. जळण्याच्या जागेचा शोध घेतला असता इंजिनच्या शेजारी असलेल्या कोचच्या चाकातून धूर निघत असल्याचे त्याना आढळले. त्यांनी ताबडतोब अलार्म चेन ओढून ट्रेन थांबवली आणि आग विझवण्यात मदत केली त्यामुळे एक अनुचित घटना टळली.

श्री समय सिंग मीना, फिटर-I, वाडी बंदर, मुंबई यांना दिनांक 20.1.2022 रोजी पंजाब मेलच्या अंडरगियरची तपासणी करताना आढळून आले की सेकंडरी सस्पेंशनच्या वरच्या आणि खालच्या कॉइल तुटलेल्या आहेत आणि त्वरित कोच उपयोगास अयोग्य असल्याचे चिन्हांकित केले आणि त्यामुळे एक संभाव्य अपघात टळला.

श्री प्रफुल्ल कुमार, गार्ड, भुसावळ हे दिनांक 23.1.2022 रोजी मालगाडीवर काम करत असताना बुरहानपूर-वाघोडा सेक्शनवर किमी 489/13-11 वर एक रेल फ्रॅक्चर पाहिला. याची माहिती त्यांनी तात्काळ स्टेशन मॅनेजर, वाघोडा यांना दिली. त्यांच्या कर्तव्याप्रती अत्यंत सतर्कता आणि दक्षतेमुळे होणारी अनुचित घटना टळली.

श्री डी.डी. कोल्हे, लोको पायलट मेल, भुसावळ हे दिनांक 25.1.2022 रोजी ट्रेन क्रमांक 12618 मंगला एक्स्प्रेसवर कार्यरत असताना नांदगाव-पांजण विभागादरम्यान झटका जाणवला. ग्रीन सिग्नल असतानाही त्यांनी ट्रेन थांबवली आणि स्टेशन मॅनेजरला याची माहिती दिली. अभियांत्रिकी विभागाने तपासणी केली असता रेल फ्रॅक्चर असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे पुढील ट्रेनमध्ये होणारी अनुचित घटना टाळता आली.

श्री शिवपाल कन्हैया, ट्रॅक मेंटेनर, नागपूर हे दिनांक 13.1.2022 रोजी गेटमन ड्युटीवर काम करत असताना तेथून जाणाऱ्या मालगाडीच्या चौथ्या वॅगनमध्ये हॉट एक्सेल असल्याचे आढळून आले. त्वरीत कारवाई करत ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला आणि स्टेशन मॅनेजर मुलताई यांना कळवले आणि त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

श्री सुधीर नानाजी, चावीवाला, नागपूर हे दिनांक 17.1.2022 रोजी काम करत असताना तेथून जाणाऱ्या मालगाडीच्या 5व्या वॅगनमध्ये हॉट एक्सेल असल्याचे दिसले. तात्काळ त्यांनी ट्रेन थांबवली आणि स्टेशन मॅनेजर, नागपूर यांना कळवले त्यामुळे संभाव्य अपघात टळला.

श्री मुकेश कुमार, ACCM-II, कोल्हापूर आणि श्री सुजित कुमार, ACCM-III, कोल्हापूर हे दिनांक 5.12.2021 रोजी काम करत असताना यार्डमध्ये उभ्या असलेल्या चार डब्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने इतर डब्यांना आगीपासून वाचवून आग विझविण्यात मदत केली. त्यांच्या सतर्कतेने आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान टळले.

श्री दिनकर सूळ, पेट्रोलमन, भाळवणी, सोलापूर हे दिनांक 11.1.2022 रोजी स्टेशनवर कार्यरत असताना ट्रेन क्रमांक 22158 एक्सप्रेसच्या 9व्या डब्यातून असामान्य आवाज ऐकू आला. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना याची माहिती दिली. जेऊर येथे थांबल्यानंतर ट्रेनची तपासणी केली असता ब्रेक ब्लॉकचा एक भाग लटकून रुळांना स्पर्श करत असल्याचे आढळून आले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

श्री महेश सदाशिव, पॉइंट्समन, सेंद्री, सोलापूर हे दिनांक 20.1.2022 रोजी काम करत असताना सिग्नलची देवाणघेवाण करताना 6 व्या वॅगनमध्ये हॉट एक्सेल असल्याचे आढळून आले. याची माहिती त्वरित सर्व संबंधितांना कळविण्यात आली. वॅगन मालगाडीपासून अलग करण्यात आल्याने संभाव्य अपघात टळला.

अनिल कुमार लाहोटी यावेळी संबोधित करताना म्हणाले की, पुरस्कार विजेत्यांनी प्रशंसनीय काम केले आहे आणि सुरक्षित कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली २४ x ७ सतर्कता इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रेरणा देईल.

बी.के. दादाभोय, अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि आलोक सिंग, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी, मुकुल जैन, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, अश्वनी सक्सेना, प्रधान मुख्य अभियांत्रिकी, अजय सदानी, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त आणि मध्य रेल्वेच्या इतर विभागांचे प्रमुख उपस्थित होते आणि तसेच सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यावेळी वेब लिंकद्वारे सामील झाले.