भुसावळ : भुसावळातील नगरसेवकांच्या अपात्रतेप्रकरणी जळगाव जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी सुरू असून सोमवारी दोन्ही पक्षांकडून खुलासा सादर करण्यात आला. पालिकेच्या 2016 च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी 17 डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतर बंदी कायद्यानुसार या नगरसेवकांविरोधात अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नऊ नगरसेवकांनी पक्षाच्या सदस्यतेचा तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचा राजीनामा न देताच पक्षांतर केल्याने महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम 1986 च्या कलम 3 अ नुसार पक्षांतर केल्याने त्यांना अपात्र करावे, अशा आशयाची याचिका भाजपच्या जेष्ठ नगरसेविका पुष्पाबाई रमेशलाल बतरा यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या प्रकरणी नऊ नगरसेवकांनी ज्यावेळी याचिका दाखल झाली त्या दिवशी अर्थात नोव्हेंबर रोजी आम्ही नगरसेवकच नव्हतो. कार्यकाळ पूर्ण झाल्यावर याचिका दाखल केली असल्याने ती रद्द करण्यात यावी, असा प्राथमिक खुलासा यापूर्वीच्या सुनावणीत दिला होता. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत तक्रारदार पक्षाने हे पक्षांतर पालिका कार्यकाळात झाल्याने संबधीत नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र करावे, असे म्हणणे सादर केले आहे. या प्रकरणी तक्रारदार बतरा यांच्यातर्फे अॅड. राजेश राय यांनी काम पाहिले तर नगरसेवकांतर्फे अॅड.महेश भोकरीकर, अॅड.हरीष पाटील, अॅड.सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले.


