भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह नूतन आयपीएस अधिकारी अर्चित चांडक यांनी जामनेर रोड भागात गुरुवारी सायंकाळी पायी गस्त करत कारवाई केल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली. विशेष म्हणजे रस्त्यावर साहित्य टाकून दुकान थाटणार्यांना कायदेशीर तंबी देण्यात आल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. गुरुवारी सुमारे 100 वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला.
डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह अन्य पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. बाजारपेठ पोलिस ठाण्यात आयपीएस अधिकारी चांडक यांची परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. बुधवारी त्यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर गुरूवारी त्यांनी नाहाटा कॉलेज चौफुली ते बाजारपेठ पोलिस ठाणे या मार्गावर पायी गस्त करत रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीला अडथळा ठरणार्या वाहनांवर कारवाई केली. रस्त्यावरील हातगाडी व्यावसायीकांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने व्यवसाय करण्याची सूचना दिली. जाम मोहल्ला आणि अमरदीप टॉकीज परीसर, खडका रोड, रजा टॉवर या भागातही त्यांनी पाहणी केली. ही मोहीम दररोज राबवण्याची सूचना त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना दिली.
शहरातील मामाजी टॉकीज जवळील परीसरासह गवळीवाडा, आठवडे बाजार, सराफ बाजार, मरीमाता मंदिर परीसरात विक्रेत्यांनी मनमानी पद्धत्तीने दुकाने थाटून रस्ता व्यापल्याने या भागातही कारवाई अपेक्षीत असल्याचा सूर यावेळी उमटत आहे.



