चिमुकल्यांना फराळ, पणत्या, दिवे, तेल आणि कपड्यांचे वाटप; दिवाळीचे महत्त्व सांगत जपला माणुसकीचा दीप भुसावळ (प्रतिनिधी) : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण असून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या सणाचा आनंद पोहोचावा, या सामाजिक भावनेतून बुधवार, दि. ४ नोव्हेंबर रोजी भुसावळ येथील जळगाव रोडवरील मरिमाता मंदिर परिसरातील भिल्ल वस्ती येथील बाल संस्कार केंद्रावर दिवाळीनिमित्त विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत बाल संस्कार केंद्रातील लहान मुलांना दिवाळीचा फराळ, पणत्या, दिवे, तेल तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील अंदाजे २० ते २५ महिला व मुले उपस्थित होती. दिवाळीच्या निमित्ताने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि त्यांच्या सणातील आनंदात सहभागी होण्या बरोबरच सण-उत्सवांचा आनंद समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, माणुसकीचा दिवा प्रज्वलित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी उपस्थित मुलांना दिवाळी सणाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांची रोषणाई किंवा फराळाचा आनंद नसून अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे आणि वाईट विचारांकडून चांगल्या विचारांकडे जाण्याचा संदेश देणारा सण आहे, याची माहिती उपस्थितांनी मुलांना दिली. लहान मुलांना दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांच्या घरातही दिव्यांचा प्रकाश आणि सणाचा उत्साह निर्माण व्हावा, या भावनेतून करण्यात आलेल्या या मदतीमुळे उपस्थित महिला व मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या सामाजिक उपक्रमासाठी अॅड. मंजुषा कुलकर्णी, अॅड. जयश्री देशमुख आणि विजया निकम यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


