भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वरणगाव रोडवरील राधाकृष्ण हॉटेलच्या गॅलरीतून खाली पडल्याने मुंबई येथील ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) पहाटे घडली. शिवानंद शिदाराम माळी (वय ४६, रा. अंधेरी पूर्व, मुंबई) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रथमदर्शनी ही घटना उंचावरून पडल्याने झालेली असल्याचे सांगितले जात असले, तरी घटनेशी संबंधित काही बाबींमुळे मृत्यूच्या परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानंद माळी हे त्यांचे मित्र रहिम मैहमुद शेख यांच्यासोबत २१ नोव्हेंबर रोजी भुसावळ येथे आले होते. विवरा बुद्रुक, ता. रावेर येथे मजुरांना सोडल्यानंतर रात्री आठच्या सुमारास दोघेही वरणगाव रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये मुक्कामासाठी थांबले. त्यांनी हॉटेलमधील खोली क्रमांक ३२३ घेतली होती. मित्राने पोलिसांना दिलेल्या खबरीत दोघांनी खोलीत मद्यपान करून जेवण केल्याचे नमूद असल्याची माहिती आहे. मात्र, या घटनेतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित हॉटेलमध्ये मद्यविक्री होत नसल्याचे समजते. त्यातच २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने मद्यविक्री बंदीचा दिवस होता. अशा परिस्थितीत खोलीत मद्यपान झाले असल्यास मद्य कोठून आणि कोणी आणले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हॉटेलमध्ये मद्यविक्रीची सुविधा नसताना तसेच ड्राय डे असताना मद्यपान झाल्याच्या दाव्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे. दरम्यान, रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास शिवानंद माली हे लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगून खोलीबाहेर गेले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने मित्राने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी माली हे हॉटेलच्या पार्किंग परिसरात गॅलरीतून खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सीसीटीव्ही आणि शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष या घटनेत मद्य कोणी आणले, दोघांनी नेमके काय सेवन केले, माली हे गॅलरीतून खाली कशा परिस्थितीत पडले, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. हॉटेलमधील सीसीटीव्ही चित्रण, खोलीतील परिस्थिती, संबंधित व्यक्तींचे जबाब, मद्याच्या उपलब्धतेचा स्रोत आणि शवविच्छेदन अहवाल या बाबी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यामुळे या मृत्यूची केवळ अपघाती घटना म्हणून नोंद न ठेवता, सर्व संबंधित बाबींची पडताळणी करून पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तपासातूनच या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.



