भुसावळात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; आरपीएफकडून संशयिताला ताब्यात ; प्रत्येकी १०० रुपये कमिशन घेऊन तिकीट दलाली; दोन रेल्वे तिकिटे जप्त

भुसावळ, प्रतिनिधी : रेल्वे आरक्षण तिकिटांची कथित काळ्या बाजारात विक्री करून प्रवाशांकडून कमिशन घेणाऱ्या इसराइल खान इस्माइल खान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) याला रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली असून, प्रत्येक तिकिटामागे १०० रुपये कमिशन घेऊन तो दलाली करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.

आरक्षण केंद्रात तपासणीदरम्यान कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.०५ वाजता भुसावळ रेल्वेस्थानकाच्या उत्तर बाजूला असलेल्या आरक्षण केंद्रात आरपीएफने तपासणी केली. सहाय्यक उपनिरीक्षक एस. जे. दुबे यांनी हवालदार राकेश पाटील यांच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई केली. या वेळी संशयित इसराइल खान याला ताब्यात घेण्यात आले.

दोन रेल्वे तिकिटे जप्त

कारवाईदरम्यान संशयिताकडून दोन रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली. त्यामध्ये १८ डिसेंबर २०२६ रोजी भुसावळहून जबलपूरकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक २२१७७ चे ७५० रुपये किमतीचे तिकीट, तसेच २० ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक १२७१५ चे १ हजार ४८० रुपये किमतीचे तिकीट समाविष्ट आहे.

प्रत्येक तिकिटामागे १०० रुपये कमिशन घेऊन तिकीट मिळवून देण्याची दलाली केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक महीलाल सिंह करीत आहेत.