दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचा रूट मार्च; विसर्जन मार्गाची पाहणी

भुसावळ ( प्रतिनिधी ) : दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.१५ ते ६ वाजेपर्यंत रूट मार्च काढण्यात आला. भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी . केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च पार पडला.

या रूट मार्चची सुरुवात रजा टॉवर येथून करण्यात आली. त्यानंतर अमरदीप चौक, मच्छी गल्ली, नवीन पैलवान गल्ली, जामा मस्जिद, गांधी चौक, मॉडर्न रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमरदीप चौक या मार्गाने पुन्हा रजा टॉवर येथे येऊन रूट मार्चची सांगता करण्यात आली.

या रूट मार्चमध्ये भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक . राहुल वाघ, शहर वाहतूक शाखेचे  राहुल भंडारे, संबंधित अधिकारी व अंमलदार, आरसीपी प्लाटून क्रमांक २, स्ट्रायकिंग फोर्स, पोलीस स्टेशनचे ३० पोलीस अंमलदार तसेच भुसावळचे तालुका समादेशक  सुरेश इंगळे यांच्यासह ५० होमगार्ड सहभागी झाले होते.

जामा मस्जिद परिसरासह विसर्जन मार्गाची पाहणी

रूट मार्चदरम्यान दुर्गादेवी विसर्जनाच्या अनुषंगाने शहरातील मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली. जामा मस्जिद परिसरात पडदा टाकण्याबाबत भुसावळ नगरपालिकेचे . वैभव पवार यांच्यासह संबंधितांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संबंधित ठिकाणाची पाहणी करून आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी संबंधित अधिकारी व अंमलदारांना आवश्यक त्या सूचना देऊन विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.