भुसावळ (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ येथे ‘माझ्या यशाची यशोगाथा – प्रेरणादायी अनुभव, भविष्याची उज्वल दिशा’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘कला आणि कलेतील उपलब्ध संधी व रोजगाराच्या वाटा’ या विषयावर रेल्वे स्कूल, भुसावळचे सेवानिवृत्त कलाशिक्षक श्री. राजेंद्र जावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. जावळे यांनी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी कला व चित्रकलेची आवड जोपासावी, असे सांगितले. चित्रकलेतील विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करण्यासोबतच कौशल्य विकसित केल्यास भविष्यात कला क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एक तरी कला गुण अंगी असावा, कला जीवनात उपयुक्त ठरते,’ असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्याचे आवाहन केले. चित्रकलेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासोबतच रोजगाराच्या विविध वाटा खुल्या होऊ शकतात, याबाबतही त्यांनी माहिती दिली. जागतिक कीर्तीचे महान कलाकार रेम्ब्राँट यांच्या चित्रशैलीचे उदाहरण देताना त्यांनी छाया-प्रकाशाचा प्रभावी वापर कसा केला जात असे, याविषयी माहिती दिली. रेम्ब्राँट आपल्या चित्रांमध्ये प्रकाश व सावलीचा अत्यंत कुशलतेने वापर करत असल्याने त्यांच्या शैलीतील प्रकाशयोजनेचा संदर्भ ‘रेम्ब्राँट लाइट’ म्हणून घेतला जातो, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नवल महाजन यांच्या हस्ते श्री. राजेंद्र जावळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विचारमंचावर पर्यवेक्षक श्री. हेमंत चौधरी व श्री. राजेश महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. मनीष गुरचळ यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



