भुसावळ (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाच्या परिपत्रकानुसार आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत भुसावळ ग्रामीण उपविभागातील शिंदी कक्षांतर्गत खंडाळा येथे महावितरणतर्फे विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे अभियान १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत आहे. खंडाळा येथील देवगिरबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ हॉलमध्ये आयोजित शिबिराला ग्रामस्थ व वीज ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला. शिबिरात ‘पंतप्रधान सूर्यघर : मोफत वीज योजना’ याबाबत जनजागृती व नोंदणीसाठी स्टॉल उभारण्यात आला होता. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना योजनेची माहिती देण्याबरोबरच मोबाईल ॲपचे थेट प्रात्यक्षिक (Live Demonstration) दाखविण्यात आले. तसेच बँक कर्जाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ तसेच ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. शेतपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सौर कृषी योजनांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शिबिरात मालमत्ता हस्तांतरणानंतर नवीन मालमत्ता धारकाच्या नावे वीज मीटर हस्तांतरित करणे, वीज बिलातील दुरुस्ती, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी आदी ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच स्मार्ट मीटरचे फायदे ग्राहकांना समजावून सांगण्यात आले. या शिबिरास महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. दिनकर महाजन (चोरवड उपविभाग), अभियंता शैलेश आखरे, जितेंद्र धांडे, नयन गावंडे, सुहास चौधरी आणि राहुल पाटील उपस्थित होते. अभियंता दिनकर महाजन व शैलेश आखरे यांनी शासनाच्या विविध वीजविषयक योजनांची माहिती उपस्थित ग्राहक व ग्रामस्थांना दिली. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांच्या विविध सेवा व तक्रारींचा तत्परतेने निपटारा केल्याने खंडाळा येथील सेवा शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.



