भुसावळ (प्रतिनिधी) : पारंपरिक शेतीच्या पुढे जाऊन शेतमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि त्यातून व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने भुसावळ येथे महिला शेतकऱ्यांसाठी आगळ्यावेगळ्या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव श्री. कुरबान तडवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या शेतीशाळेत महिला शेतकऱ्यांना शेतात उत्पादित होणाऱ्या विविध पिकांपासून प्रक्रिया केलेली विविध उत्पादने तयार करून त्यातून व्यवसाय उभारणी कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘शेतमाल विक्री’पासून ‘मूल्यवर्धना’कडे या संकल्पनेतून प्राथमिक प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता, आकर्षक पॅकेजिंग, ब्रँडिंग, योग्य बाजारपेठेची निवड, उत्पादनाला योग्य दर मिळविणे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळविणे, ही संपूर्ण साखळी महिलांना समजावून सांगण्यात आली. यावेळी गाढोदा येथील विष्णू ॲग्रोचे अनिल पाटील तसेच नवल प्रभा फूडचे जयेश भाई सोनी यांनी महिलांना त्यांच्या विविध उत्पादनांची माहिती दिली. तसेच महिला बचत गट व शेतकरी गटांकडून त्यांच्या उत्पादनांसाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध करून देण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे शेतीपूरक प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती उपस्थितांना मिळाली. कार्यक्रमादरम्यान महिला शेतकऱ्यांनी विविध प्रक्रिया उद्योगांच्या संधींबाबत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उत्पादन निर्मिती, त्याची गुणवत्ता, बाजारपेठ, विक्री व्यवस्था तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींविषयी महिलांनी प्रश्न विचारून माहिती जाणून घेतली. “प्रत्येक अंधारानंतर नवा प्रकाश नक्कीच येतो,” या सकारात्मक विचारातून पावसाच्या खंडाच्या काळातही कृषी विभाग क्षेत्रीय स्तरावर शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा आधार उपस्थितांना मिळाला. महिला शेतकऱ्यांना ज्ञान, कौशल्य आणि व्यवसायाची दिशा देणारी ही शेतीशाळा ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली. शेतीत केवळ धान्यच पिकत नाही, तर त्यातून प्रक्रिया उद्योग आणि व्यवसायही उभा राहू शकतो, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. भुसावळ तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी ऋषिकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, भुसावळ टीमच्या परिश्रमातून ही शेतीशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.


