भुसावळ (प्रतिनिधी)-: महिला पतंजली योग समिती, भुसावळच्या वतीने ‘आज के युग के धन्वंतरी’ तथा आयुर्वेद शिरोमणी आचार्य श्री बालकृष्णजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जडीबुटी दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भुसावळजवळील कुऱ्हा येथील चौरंगीनाथ टेकडीवर विविध औषधी व उपयुक्त वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. चार जिल्ह्यांचे नेतृत्व करणाऱ्या राज्य कार्यकारिणी सदस्य महानंदाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिला पतंजली योग समितीच्या सर्व पदाधिकारी, योगशिक्षिका तसेच विविध योगवर्गांतील योगसाधक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. चौरंगीनाथ टेकडी परिसरात वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, रामफळ, तुळस आणि कोरफड आदी वृक्ष व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. योगवर्गातील व्ही. डी. पाटील सर यांनी या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले. त्यांनी स्वतः खड्डे खोदून वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी कुऱ्हा गावचे सरपंच यांनीही भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. लावण्यात आलेल्या वृक्षांची नियमित निगा राखली जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. तसेच या परिसरात यापूर्वीच पाण्याची व्यवस्था व ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने वृक्षांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होणार आहे. पर्यावरण संवर्धन, औषधी वनस्पतींचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सर्व योगशिक्षिका व योगसाधक उपस्थित होते.


