भुसावळ (प्रतिनिधी ): येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय असंतोषाचे जनक व थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या निना कटलर यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या निना कटलर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!’ हा लोकमान्य टिळकांचा नारा आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करून जीवनात शिस्त, देशप्रेम आणि कठोर परिश्रमाची वृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला. ‘लोकमान्य टिळक अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोफिया पी. बॉडी यांनी केले, तर आभार प्रदर्शन हर्षला चौधरी यांनी केले. अत्यंत उत्साही व भारावलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


