भुसावळात अतिक्रमण प्रकरणी दोघांना नगरपरिषदेची नोटीस ; सी.एस. नं. ४२९२-ब मधील जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार; खुलासा सादर करण्याचे आदेश ;

भुसावळ प्रतिनिधी) - शहरातील सी.एस. नं. ४२९२-ब या जागेवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीची दखल घेत भुसावळ नगरपरिषदेने संबंधित दोन्ही अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली आहे. सदर जागेवरील अतिक्रमणाबाबत तात्काळ लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकारी, भुसावळ नगरपरिषद यांनी दिले आहेत.

सौ. चंद्रकांता सुरेश देवडा यांच्यातर्फे ज.मु. संदीप सुरेश देवडा यांनी दि. ७ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ नगरपरिषदेकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीनुसार, भुसावळ नगरपरिषद हद्दीतील सी.एस. नं. ४२९२-ब या एकूण १५५.४० चौ.मी. क्षेत्रफळाच्या जागेपैकी पूर्वेकडील बाजूच्या दक्षिण भागातील अंदाजे ८.९८ चौ.मी. जागेवर अतुल दत्तात्रय दाभाडे व सौ. मिनाक्षी अतुल दाभाडे यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, याच जागेच्या पश्चिमेकडील बाजूच्या दक्षिण भागातील अंदाजे ८.०७ चौ.मी. जागेवर पक्के दुकान उभारून अशोक गुरुनामल नागराणी यांनी अतिक्रमण केल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

या तक्रारीची दखल घेत भुसावळ नगरपरिषदेने संबंधितांना नोटीस बजावून, नोटीस मिळाल्यापासून सदर अतिक्रमित जागेबाबत आपला लेखी खुलासा तात्काळ नगरपरिषद कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, संबंधित अतिक्रमणाबाबत नगरपरिषद प्रशासन पुढील कोणती कारवाई करते, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमणधारकांकडून सादर होणाऱ्या खुलाशानंतर नगरपरिषद प्रशासनाकडून पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.