भुसावळ (प्रतिनिधी) -: “माझे शेत... माझे पंढरपूर!” या भावनेतून मन्यारखेडा, ता. भुसावळ येथे शेतकरी गटांच्या शेतावर विठ्ठल-रखुमाई पूजन करून वारी फार्मर कप उपक्रमाचा भक्तिमय व प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडला. वस्त्रोद्योग मंत्री ना. श्री. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या पूर्णवेळ सहभागातून हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती हर्षदा देसले, तहसीलदार श्रीमती नीता लबडे, तालुका कृषी अधिकारी श्री. ऋषिकेश चौधरी, कृषी विभाग भुसावळची संपूर्ण टीम, पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. प्रल्हाद अडसूळ, कृषी मेंटॉर संगिता पाटील, उमेद मेंटॉर श्री. राहुल ठोसरे, प्रियंका पाटील, प्रियंका बैसाणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शेतकरी गटांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या शेतीतील विविध नवोपक्रमांची माहिती जाणून घेतली. विशेषतः महिला शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक करून त्यांनी त्यांचा उत्साह वाढविला.
महिला कापूस शेतीशाळेला क्षेत्रभेट
कार्यक्रमादरम्यान महिला कापूस शेतीशाळेला क्षेत्रभेट देण्यात आली. यावेळी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, चिकट सापळे, पक्षी थांबे, जीवामृत, फेरोमन सापळे, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच ड्रोन फवारणी अशा शाश्वत व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या विविध प्रात्यक्षिकांची पाहणी करण्यात आली.
यानंतर जिल्हाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, भजनी मंडळ, महिला शेतकरी आणि शेतकरी गटांच्या सहभागातून तब्बल दोन किलोमीटरची पायी वारी काढण्यात आली. भक्तिमय वातावरणात ही वारी कार्यक्रमस्थळी पोहोचली.
ही वारी केवळ भक्तीची नव्हे, तर शेतकरी एकजुटीची, कृषी नवोपक्रमांची आणि समृद्ध शेतीची वारी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची टीम, उमेद अभियान भुसावळ आणि पाणी फाउंडेशन टीम जळगाव यांनी परिश्रम घेतले.