भुसावळात सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती

भुसावळ (प्रतिनिधी)- नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा रविवारी सायंकाळी उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, तसेच लोकसभा व विधानसभा सदस्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी रोहन धुगे, उपविभागीय अधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागातील वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी नोंदणी विभागाच्या आधुनिक व सुसज्ज कार्यालयामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन कार्यालयामुळे नागरिकांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ होऊन नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.