महाआरती, शोभायात्रा, वृक्षारोपणासह विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम; पौर्णिमेला नियमित महाआरतीचा संकल्प
भुसावळ (प्रतिनिधी )- सूर्यकन्या माता तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त भुसावळात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात भाविकांच्या वतीने माता तापीस १०८ मीटर लांबीची साडी श्रद्धाभावाने अर्पण करण्यात आली. यावेळी महाआरती, भजन, कीर्तन, पूजन आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे मोठ्या संख्येने बालकांनी या सोहळ्यात सहभाग घेतल्याने वातावरण अधिकच चैतन्यमय झाले. कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे पौरोहित्य मंगेश जोशी यांनी केले. तसेच दर महिन्याच्या पौर्णिमेला सायंकाळी ६ वाजता जुने महादेव मंदिर तापी घाट येथे सामूहिक महाआरती घेण्याचा संकल्प उपस्थित भाविकांनी केला. तापी नदी व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष 'तापी घाट'ची निर्मिती करून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे माता तापीस अर्पण करण्यात आलेली १०८ मीटर साडी गरीब व गरजू महिलांना मोफत वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमास लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे, डॉ. रेखा पाटील, प्रभू स्वामी, ह.भ.प. प्रल्हाद ढाके महाराज, नर्मदा व तापी परिक्रमा वासी श्री. प्रकाश धांडे महाराज, माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी, प्रकाश जैस्वाल, शिशिर जावळे, वसंत पाटील (नाशिक), आशिष तिवारी, मंगला पाटील, स्वाती भोळे, प्रभाताई पाटील, प्रा. डॉ. भाग्यश्री भंगाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुषार जयस्वाल, महेश पाटील, कैलासिंह चव्हाण, जयप्रकाश शुक्ला, प्रगती पाटील, नेहा देगलूरकर, वैशाली बराटे, दिलीप टाक, आर. के. कोळी, देवेंद्र वराडे, दिलीप खंडेलवाल, शैलजा ताई पाटील, हितेंद्र कोलते, विनय बेंडाळे, किरण पाटील, सतीश पाटील, विशाल बोरोले, सचिन नेवे यांच्यासह विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये सूर्यकन्या ताप्ती भक्त परिवार, साई निर्मल फाउंडेशन, तिवारी फाउंडेशन, सकल लेवा महिला मंडळ, संत सेवा मंडळ, देनानगर मंडळ, इस्कॉन मंडळ भुसावळ, सुंदरकांड आस्था परिवार, भुसावळ तालुका ज्येष्ठ नागरिक संघ, राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार, जळगाव महिला भजनी मंडळ, भुसावळ खानदेश आई ग्रुप तसेच विविध सामाजिक संस्थांचा सहभाग होता. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सायंकाळी ६ वाजता जुने महादेव मंदिर तापी घाट येथे सामूहिक आरतीचा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.


