राहुल सांकृत्यायन यांच्या पुतळ्याच्या हटविण्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक-सांस्कृतिक विचारवंत जयसिंग वाघ यांचा सवाल
जळगाव - बौद्ध तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक , बौद्ध तत्त्वचिंतक , बौद्ध भिक्खु म्हणून सुपरिचित असलेल्या राहुल सांकृत्यायन यांचा पश्चिम बंगाल मधील राणीगंज येथील पंजाबी मोड वरील ९ फूट उंचीचा पुतळा काही लोकांनी दिनांक १७ जुलै २०२६ रोजी पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकला आहे . हा पुतळा कोळसा कामगार युनियन तर्फे १९९४ मध्ये उभारण्यात आला होता .
राहुल सांकृत्यायन यांचा उत्तर प्रदेशातील चक्रपानपुर येथील पुतळा सुद्धा १८ ऑगस्ट २०१८ ला पूर्णतः उखडून फेकण्यात आला होता. या पुतळ्या पासून अवघ्या २५ मीटर अंतरावर पोलीस स्टेशन असतानासुद्धा पोलिसांना या घटनेची माहिती नसल्याचे दिसून आले होते .या घटनेस ८ वर्षे झालीत मात्र तिथल्या पोलिसांना अजूनही गुन्हेगाराचा शोध घेता आलेला नाही . सरकारने या जागेचे २०२१ मध्ये सुमारे ६६ लाख रुपये खर्चून सुशोभीकरण केले आहे .
भारतात सत्ताबदल झाल्यानंतर पुतळे हटविण्याचे प्रकार अलिकडं होत आहेत . मध्यंतरी लेनिन , पेरियार , बाबासाहेब यांचेही पुतळे तोडण्यात आले होते . आता पश्चिम बंगाल मध्ये सत्तांतर झाले आणि राहुल सांकृत्यायन यांचा पुतळा उद्ध्वस्त केला . या पुतळ्याचे कोणतेच अवशेष तिथं शिल्लक ठेवले गेले नाही , यावरून या पुतळ्या विषयी , राहुल सांकृत्यायन यांच्याविषयी किती कमालीचा द्वेष आहे हे दिसून येते . वास्तविक ते कोणी राजकीय नेते , हिंदू धर्म विरोधक म्हणून प्रसिद्ध व्यक्ती नाहीत . मुस्लिम धर्माचे पुरस्कर्ते म्हणूनही त्यांची साधी ओळख नाही . सुरवातीच्या काळात रशियन क्रांतीचे केलेले समर्थन व मार्क्सवादावर लिहिलेली पुस्तकं हा यामागील उद्देश जरी असला तरी पुतळा उद्ध्वस्त करणे हे काही समर्थनीय ठरत नाही . पश्चिम बंगाल तर मार्क्सवादी नेत्यांची सुवर्णभूमी राहिलेली आहे , शेकडो मार्क्सवादी इथूनच उदयास आले आहेत. राहुल सांकृत्यायन यांची तर मार्क्सवादी नेते म्हणून ओळखही नाही . मग त्यांच्या विषयी एवढा द्वेष का ?
राहुल सांकृत्यायन यांचे पूर्वाश्रमीचे नाव केदारनाथ पांडे होते . त्यांच्या आई , वडिलांनी बौद्ध धर्म स्वीकारला असता मुलाचे नाव राहुल व गोत्र सांकृत्यायन असल्याने ते आडनाव म्हणून लावले . केदारनाथ पांडे पुढं राहुल सांकृत्यायन म्हणून प्रचलित झाले . ते सुरवातीस मार्क्स विचाराचे होते , पुढं ते आर्य समाजाकडं वळले त्या नंतर त्यांचा लखनौ येथील बोधानंद या बौद्ध भीक्खु सोबत परिचय झाला . त्यांच्या सोबत त्यांनी अनेक बौद्ध स्थळं बघितली . प्रत्येक ठिकाणी त्यांना परदेशी बौद्ध पर्यटक भेटत गेल्याने बौद्ध धर्म विविध देशांमध्ये सुद्धा आहे हे कळून चुकले तेंव्हा विविध देशांची भाषा ते शिकले. त्यांनी हिंदी , उर्दू , संस्कृत , प्राकृत , पाली , इंग्रजी , अरबी , फार्सी , फ्रेंच , तामिळ , कन्नड , चिनी , तिबेटी , जपानी , रशियन या भाषांवर प्रभुत्व मिळविले .
त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला असता वेगवेगळ्या कालावधीत त्यांना एकूण पाच वर्षाची जेल झालेली आहे . त्यांनी श्रीलंकेत जाऊन बौद्ध भिक्खु म्हणून दीक्षा घेतली आहे . तिबेट मधून काही मुळ बौद्ध साहित्य गोळा केले आहे . त्यांनी माझिमनिकाय , धम्मपद , विनयपिटक, दिघनिकाय या बौद्ध ग्रंथांचे हिंदीत अनुवाद केला आहे . त्यांनी भंते जगदीश कश्यप , भंते डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांच्या मदतीने खुद्दक निकाय चे ११ खंड हिंदीत अनुवादित केले . त्यांनी बुद्ध चरित्र , बुद्ध चर्या , महामानव बुद्ध हेंग्रंथ सुद्धा लिहिले आहेत . त्यांनी २५ पेक्षा अधिक बौद्ध देशांना भेटी दिल्या आहेत .
१९३८ मध्ये त्यांना अडीच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, तेंव्हा जेलमध्ये राहून त्यांनी वोलगा ते गंगा हे पुस्तक लिहिले , हे पुस्तक १५ भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहे . एक बुध्दीप्रामाण्यवादी , तत्त्वचिंतक , स्वातंत्र्यसेनानी असलेल्या व्यक्तीचे पुतळे जर उद्ध्वस्त केले जात असतील तर आम्ही माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत .
ज्यांनी हा पुतळा उद्ध्वस्त केला असेल त्यांना ताबडतोब पकडुन कठोरात कठोर शिक्षा करणे व पुन्हा तिथं राहुल सांकृत्यायन यांचा पुतळा उभारणे गरजेचे आहे .
जयसिंग वाघ
अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक , जळगाव
संपर्क ….. ९८८१९२८८८१